Farmer Loan Waiver : तारीख पे तारीख! दुसऱ्यांदा हुकला कर्जमाफीचा मुहूर्त; ‘या’ कारणामुळे शेतकऱ्यांना मोजावे लागतायत दिवस

spot_img

पावसाळी अधिवेशनातील घोषणेनंतरही रखडली २ लाखांपर्यंतची कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूरच्या वारीत दिली नवीन डेडलाईन.

महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक ठरणाऱ्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रतीक्षा आता अधिकच लांबली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषांमध्ये बदल करून सर्वच पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मोठी घोषणा केली खरी, पण प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार? हा यक्षप्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. सुरुवातीला ३० जून ही तारीख ठरली होती. त्यानंतर ‘राज्यपालांची स्वाक्षरी झाली नाही’ असे तांत्रिक कारण पुढे करत ५ जुलैचा मुहूर्त देण्यात आला, पण तोही हुकला. आता जुलैचा पंधरवडा उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही.

सारख्या बदलणाऱ्या तारखांमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली असतानाच, आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपुरातून शेतकऱ्यांना नवीन आश्वासन दिले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असला तरी जुलै महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील. पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारने २० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करून या योजनेसाठी आवश्यक तरतूद केली आहे. परंतु, निकषांमधील काही बदलांमुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे.

कर्जमाफीचा मुहूर्त दोनदा हुकण्यामागे सरकारने एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे. ते म्हणजे ‘आयकर (Income Tax) भरणारे शेतकरी’.
योजनेचा गैरफायदा टाळण्यासाठी आणि केवळ गरीब व गरजू शेतकऱ्यांनाच याचा थेट लाभ मिळावा, यासाठी सरकारने करदात्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्याने केंद्र सरकारकडे राज्यातील आयकर भरणारे शेतकरी किती, याचा अचूक डेटा मागवला आहे. हा डेटा केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्याशिवाय अंतिम यादी जाहीर करणे शक्य नसल्याने कर्जमाफीला विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

आता नव्या निकषांच्या चौकटीत बसवून सरकार जुलैअखेरची ही नवीन डेडलाईन पाळणार की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’ मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ