पतीच्या बदललेल्या वागण्यावर नजर ठेवण्यासाठी पत्नीने रचला चक्रव्ह्यूह; हॉटेलबाहेर आणि न्यायालयात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
नात्याचा पाया हा विश्वासावर आधारलेला असतो, पण तोच विश्वास तुटला की काय घडू शकतं, याचं एक धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये पाहायला मिळालं आहे. एका पत्नीने आपल्या पतीच्या अफेअरचा पर्दाफाश करण्यासाठी थेट तंत्रज्ञानाचा (GPS) वापर करत त्याला रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर जो राडा झाला, त्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे.
बागपत येथील एका महिलेला तिच्या पतीच्या वागणुकीत काही दिवसांपासून बदल जाणवत होता. पतीच्या चारित्र्यावर संशय आल्याने तिने एक धाडसी पाऊल उचललं. आपल्या दिराच्या मदतीने तिने पतीच्या कारमध्ये गुपचूप GPS ट्रॅकर बसवला. या ट्रॅकरच्या माध्यमातून ती पतीच्या प्रत्येक लोकेशनवर बारीक लक्ष ठेवून होती.
रविवारी नेहमीप्रमाणे पती घरातून बाहेर पडला, पण यावेळी पत्नीही त्याच्या मागावर होती. GPS सिग्नल फॉलो करत ती आपल्या माहेरच्या मंडळींना घेऊन थेट हापूडच्या मोदीनगर रोडवरील ‘बांके बिहारी हॉटेल’मध्ये पोहोचली. तिथे एका खोलीत पतीला दुसऱ्याच महिलेसोबत पाहून पत्नीचा संताप अनावर झाला.
त्यानंतर हॉटेलच्या आवारातच जोरदार वाद सुरू झाला. नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. हा हायव्होल्टेज ड्रामा हॉटेलमधून थेट रस्त्यावर आला. रस्त्यावरील गर्दीने तात्काळ मोबाईल बाहेर काढून याचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, जे आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पती-पत्नी दोन्ही पक्षांना ताब्यात घेतले. शांतताभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. खऱ्या नाटकाची सुरुवात तर यानंतर झाली. कारवाईनंतर पतीला जामीन मिळवण्यासाठी SDM न्यायालयात आणण्यात आले होते. जामीन मिळून बाहेर पडताच, संतप्त पत्नीने न्यायालयाच्या आवारातच पतीला गाठले आणि तिथेच त्याला पुन्हा एकदा ‘धु-धु’ धुतले. कोर्ट परिसर या अनपेक्षित प्रकाराने हादरून गेला.
पीडित पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत दावा केला आहे की, तिच्या पतीसोबत आढळलेली महिला बुलंदशहर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. स्थानिक लोकांमध्येही हीच चर्चा आहे, मात्र पोलीस सध्या या दाव्याची कायदेशीर पडताळणी करत आहेत. हापूड पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून सखोल चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सध्या या भागात चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.




