आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दर्शन हे प्रत्येक भाविकासाठी श्रद्धेचे केंद्र असले, तरी पंढरपूरचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा केवळ मुख्य मंदिरापुरता मर्यादित नाही. या पवित्र नगरीत अनेक अशी स्थळे आहेत, जी संतपरंपरा, भक्ती आणि इतिहासाची साक्ष देतात. चंद्रभागा नदीच्या पात्रातील लोहदंड तीर्थ हे त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान असून, येथे असलेली दगडी नाव भाविकांचे विशेष आकर्षण ठरते. मंदिरातील नामदेव पायरी संत नामदेवांच्या अखंड भक्तीची आठवण करून देते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उभारलेला ऐतिहासिक वाडाही पर्यटकांसाठी पाहण्याजोगा आहे. दिंडीरवनातील लखुबाई मंदिर, विविध संत आणि धार्मिक परंपरांचा परिचय करून देणारा कैकाडी महाराज मठ, तसेच १६ खांबांवर उभारलेले विष्णूपद मंदिर हेही श्रद्धाळूंच्या भेटीचे प्रमुख केंद्र आहेत.
महाद्वार घाटासमोरील भक्त पुंडलिक मंदिर वारकरी संप्रदायात विशेष महत्त्वाचे मानले जाते, तर गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी असलेले जनाबाई मंदिर भक्तांना अध्यात्मिक अनुभव देतात. विठ्ठल मंदिरासमोरील गरुड खांब हा मंदिराच्या स्थापत्यकलेचा अविभाज्य भाग मानला जातो. याशिवाय गणेश, दत्त, मारुती आणि नरसिंह मंदिरांसह अनेक धार्मिक स्थळे पंढरपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालतात. त्यामुळे यंदा आषाढी वारीला पंढरपूरला भेट देताना विठ्ठलाच्या दर्शनासोबत या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांनाही अवश्य भेट देऊन भक्ती, इतिहास आणि संस्कृतीचा समृद्ध अनुभव घ्यावा.




