राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि कोकणातील अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून, काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. झाडे कोसळणे, वाहतुकीत अडथळे आणि नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ अशा घटना सातत्याने घडत आहेत. नाशिकमधील गोदावरी आणि पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीनेही धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
मात्र, या पावसाच्या चित्राला धाराशिव जिल्हा अपवाद ठरत आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना धाराशिवमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी बहुतांश भाग अजूनही कोरडाच आहे.
पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली असून शेतकरी चिंतेत आहेत. पेरणीसाठी योग्य पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबवली आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत असून, अनेक नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
एकीकडे राज्यातील काही भाग पूराच्या संकटाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे धाराशिवसारख्या भागात पावसाच्या प्रतीक्षेत दिवस जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. आता येत्या काही दिवसांत मान्सूनची जोरदार सर धाराशिवकडे वळते का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.




