Mumbai Crime : घरात चोरी, १४ वर्षे विश्वासाने काम करणाऱ्या मोलकरणीवर दागिन्यांच्या चोरीचा आरोप

spot_img

मुंबईतील करी रोड परिसरात विश्वासाला तडा देणारी चोरीची घटना समोर आली आहे. तब्बल १४ वर्षांपासून एका कुटुंबाकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणीवर सुमारे आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला महानगरपालिकेतून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या असून त्या आपल्या पती आणि मुलासह करी रोड येथे राहतात. योगिता नावाची ४५ वर्षीय महिला त्यांच्या घरी अनेक वर्षांपासून घरकाम करत होती. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस काही कारणांमुळे तिला कामावरून कमी करण्यात आले होते. याच काळात शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, त्या घरातही योगिता घरकामासाठी जात होती. संबंधित व्यक्तीने तिची चौकशी केली असता तिने चोरीची कबुली देत दागिने परत केल्याची माहिती समोर आली. ही बाब समजल्यानंतर तक्रारदार महिलेनेही आपल्या घरातील कपाट तपासले असता दोन सोन्याचे हार, झुमके, सोन्याची चैन, साईबाबांचा पेंडंट आणि इतर दागिने असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर योगितावर संशय व्यक्त करत तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अद्याप आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नसली तरी तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ