आषाढी वारीच्या पवित्र पर्वाला आणखी एक भक्तिमय सुरुवात झाली असून संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या पालखी सोहळ्याचे आज पैठण येथून उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. पहाटेपासूनच हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. टाळ, मृदंग, वीणेचा नाद, हरिनामाचा अखंड गजर आणि अभंगांच्या सुरावटींनी संपूर्ण पैठण नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. “विठ्ठल… विठ्ठल…”, “संत एकनाथ महाराज की जय” आणि “संत भानुदास महाराज की जय” अशा जयघोषात पालखीने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. यंदाच्या वारीत पालखी तब्बल २८५ किलोमीटरचा प्रवास करत १८ दिवसांनी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे. या प्रवासात राज्यातील विविध गावांमधून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून हजारो वारकरी पायी चालत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
वयोवृद्ध, महिला, युवक आणि लहान मुलांसह सर्वच वयोगटातील भाविकांनी या वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही व्यापक नियोजन केले असून पालखी मार्गावर पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन मदत पथके तैनात करण्यात आली आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आषाढी एकादशी जवळ येत असताना आता संत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत विठुरायाच्या भेटीची ओढ अधिकच वाढली असून, भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा हा अखंड प्रवास पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देत आहे.




