राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असतानाही राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे समोर आले आहे. सततचा कामाचा ताण आणि धावपळ यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून राज्यातील पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच, सर्व संबंधित विभाग आणि शाखा प्रमुखांनी पावसाळ्यात सतर्क राहून कामकाज सुरू ठेवावे, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी आणि कोणतीही समस्या दुर्लक्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी गंगूबाई शिंदे सभागृहात आयोजित कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते; मात्र प्रकृती अचानक बिघडल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्याऐवजी खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.




