Sanjay Raut : “कारसेवकांनी संयम ठेवला असता तर राम मंदिर बनले असते का?” संजय राऊतांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट हल्ला

spot_img

राम मंदिर चोरी प्रकरणावरून राजकारण तापले; ट्रस्ट बरखास्त करून नवीन त्रयस्थ समिती नेमण्याची ठाकरे गटाची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील कथित निधी अपहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यात आता थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या चोरी प्रकरणावर संघाने नागरिकांना ‘संयम आणि धैर्य’ राखण्याचे आवाहन केले होते. संघाच्या या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. “जर ९० च्या दशकात कारसेवकांनी केवळ संयम आणि धैर्य पाळले असते, तर आज अयोध्येत राम मंदिर उभे राहिले असते का?” असा बोचरा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तेव्हा कायदेशीर मार्गाच्या गप्पा न मारता कारसेवकांनी छातीवर गोळ्या झेलल्या आणि घुमट उद्ध्वस्त केला, म्हणूनच आज मंदिर अस्तित्वात आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका चोरांना पाठीशी घालणारी असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी भाजप आणि संघावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “राम मंदिर आंदोलनाच्या काळात हजारो कारसेवकांनी बलिदान दिले. मुंबईत झालेल्या दंगलीत ३५० हून अधिक शिवसैनिक आणि हिंदू हुतात्मे झाले. त्या संघर्षाच्या आणि बलिदानाच्या काळात भाजप किंवा संघ कुठेही आघाडीवर नव्हता. त्याग आणि रक्त आम्ही सांडले आणि आता सर्व काही सुरळीत झाल्यावर तुम्ही आम्हाला संयमाचे डोस पाजत आहात.” या प्रकरणात ५ पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असल्याने ही साधी चोरी नसून राम मंदिरावर पडलेला थेट ‘दरोडा’ आहे, असा दावाही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी सध्याच्या राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हा ट्रस्ट तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. “हा रामभक्तांचा नसून केवळ भाजपचा एकपक्षीय ट्रस्ट आहे. भाजपची कातडी वाचवण्यासाठी संघाने स्वतःची ढाल बनू नये,” अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी या लुटीविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यानंतरच संघाने घाईघाईने ही भूमिका घेतल्याचे सांगत, या आंदोलनाची ठिणगी आता संपूर्ण देशात पसरणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ