नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान एक गंभीर आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. नेरुळ परिसरातील एलपी उड्डाणपुलाजवळ पावसाच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पावसाळ्यातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नेरुळमधील एलपी स्टॉप परिसरात असलेल्या एका व्यावसायिक आस्थापनासमोरील रस्त्यावर ही दुर्घटना घडली. सततच्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याचदरम्यान, विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याने पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या मार्गावरून जात असलेल्या दोन विद्यार्थिनी अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने रस्त्यावरच कोसळल्या. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोन्ही विद्यार्थिनींना सुरक्षित स्थळी हलवले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, विद्युत पुरवठा यंत्रणेत नेमका कुठे बिघाड झाला, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी साचलेल्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगावी आणि विद्युत उपकरणे किंवा खांबांच्या परिसरात काळजीपूर्वक वावरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.




