पावसाळा सुरू झाल्यावर अनेकजण छत्री, रेनकोट आणि गरम चहाचा आनंद घेतात, मात्र या काळात त्वचेची काळजी घेण्यातील एक महत्त्वाचा टप्पा अनेकदा दुर्लक्षित होतो तो म्हणजे सनस्क्रीनचा वापर. आकाश ढगाळ असल्यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी वाटत असली तरी अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणे त्वचेवर परिणाम करतच असतात. त्यामुळे केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही योग्य SPF असलेले सनस्क्रीन वापरणे तितकेच आवश्यक ठरते. त्वचेचे टॅनिंग, पिग्मेंटेशन, काळे डाग आणि अकाली सुरकुत्या यांसारख्या समस्या टाळण्यासाठी सनस्क्रीन महत्त्वाची भूमिका बजावते.
त्वचेचा प्रकार ओळखून योग्य सनस्क्रीन निवडणे अधिक फायदेशीर ठरते. तेलकट त्वचेसाठी हलका, मॅट फिनिश असलेला जेल बेस्ड सनस्क्रीन उपयुक्त मानला जातो, जो त्वचेला चिकटपणा न देता अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवतो. अशा त्वचेसाठी SPF 35 ते SPF 50 योग्य मानला जातो. कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग लोशन किंवा फ्लुइड सनस्क्रीन अधिक प्रभावी ठरतो, कारण तो त्वचेला ओलावा देत संरक्षणही करतो; यासाठी SPF 50 चा पर्याय उत्तम मानला जातो. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी मिनरल किंवा फिजिकल सनस्क्रीन सुरक्षित मानला जातो, जो त्वचेवर संरक्षक थर तयार करून UV किरणांपासून बचाव करतो.
सनस्क्रीन वापरताना पॅच टेस्ट करणे, तसेच दीर्घकाळ बाहेर असताना वेळोवेळी पुन्हा लावणे आवश्यक आहे. त्वचेवर कोणतीही अॅलर्जिक प्रतिक्रिया दिसल्यास त्वरित वापर थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. एकूणच, पावसाळ्यातही त्वचेची काळजी तितकीच महत्त्वाची असून योग्य सनस्क्रीन निवडल्यास त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवता येते.




