Ek Hota Malin Marathi Movie : ‘एक होतं माळीण’चा हृदयद्रावक टीझर प्रदर्शित; महाराष्ट्राला हादरवणारी सत्यकथा रुपेरी पडद्यावर

spot_img

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या माळीण गावावर 30 जुलै 2014 रोजी ओढवलेली भीषण नैसर्गिक आपत्ती आजही अनेकांच्या स्मरणात जिवंत आहे. एका रात्रीत संपूर्ण गावाला गिळंकृत करणाऱ्या भूस्खलनाच्या या हृदयद्रावक घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा मराठी चित्रपट येत्या 24 जुलै रोजी राज्यभर प्रदर्शित होणार असून, नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांना भावूक केले आहे. एका क्षणात उद्ध्वस्त झालेली घरे, तुटलेली नाती आणि कायमची हरवलेली स्वप्ने यांचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे.

या चित्रपटाची निर्मिती ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या माध्यमातून करण्यात आली असून, अनेक अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञांनी या प्रकल्पात योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान दिग्दर्शकांनी माळीण दुर्घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदार आणि ग्रामस्थांशी संवाद साधून घटनांचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे कथानकाला वास्तवाची प्रभावी जोड मिळाल्याचे दिसून येते. बदलापूर येथे उभारण्यात आलेला माळीण गावाचा भव्य सेट, प्रभावी छायांकन, दर्जेदार व्हीएफएक्स आणि भावस्पर्शी संगीत ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत.

चित्रपटाचा टीझर पाहताना त्या भीषण रात्रीची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी ठरते. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांचा संघर्ष आणि मानवी भावनांचे हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे ‘एक होतं माळीण’ हा केवळ एक चित्रपट नसून, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका वेदनादायी अध्यायाची भावनिक पुनर्कथा ठरणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ