अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीशी संबंधित कथित प्रकरणावरून राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले आणि या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधकांनी एकत्रितपणे सरकारवर निशाणा साधत घोषणाबाजी केली. “वोट चोर, चंदा चोर” अशा घोषणा देत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
तसेच राम मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. आंदोलनादरम्यान “रामभक्तांची एकच मागणी, देणगी चोरांना फाशी” आणि “मंदिर रामभक्तांनी बांधलं, पण दानपेटी लुटली” अशा घोषणांनी परिसर काही काळ गजबजून गेला. या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असून अधिवेशनात पुढील चर्चेत सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




