हवेतील आर्द्रतेमुळे बुरशीजन्य आजारांचा धोका दुप्पट; संसर्गापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांचा सोपे घरगुती उपाय शोधण्याचा सल्ला
पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप जितके सुंदर दिसते, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी अनेक आव्हाने घेऊन येते. या दिवसांत वातावरणात अचानक होणारे बदल आणि हवेतील वाढलेली आर्द्रता (Moisture) यामुळे त्वचेच्या विविध समस्या वेगाने डोके वर काढतात. पावसाळ्याच्या दिवसांत सर्वाधिक धोका असतो तो ‘फंगल इन्फेक्शन’चा (Fungal Infection) म्हणजेच बुरशीजन्य संसर्गाचा. पावसात भिजणे, दीर्घकाळ ओले कपडे किंवा बूट घालून ठेवणे, आणि जास्त घाम येणे यांसारख्या सवयींमुळे त्वचेवर बुरशीची वाढ अत्यंत वेगाने होते. यामुळे होणारी खाज, लाल चट्टे आणि दाद यांसारखे त्रास केवळ त्रासदायक ठरत नाहीत, तर वेळीच काळजी न घेतल्यास ते संपूर्ण शरीरावर पसरू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग कोणालाही होऊ शकत असला, तरी काही विशिष्ट व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. विशेषतः मधुमेह (Diabetes) असलेले रुग्ण, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्ती, कॅन्सर पीडित किंवा ज्यांना अतिप्रमाणामध्ये घाम येतो, अशांनी पावसाळ्यात अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. जर तुमच्या त्वचेवर सतत लाल चट्टे येत असतील, जळजळ होत असेल, त्वचा फाटत असेल किंवा नखे पिवळी पडत असतील, तर हे फंगल इन्फेक्शनचे प्राथमिक संकेत असू शकतात.
संसर्गापासून संरक्षणासाठी ५ सुवर्णनियम:
पावसाळ्यात शरीर नेहमी स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. हवेची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी नेहमी सैल आणि सुती (Cotton) कपडे वापरा. संसर्ग पसरू नये म्हणून स्वतःचा टॉवेल, कंगवा किंवा रेझर इतरांना वापरू देऊ नका. कपडे धुताना नेहमी जंतूनाशक लिक्विडचा वापर करा आणि ते उन्हात कडक सुकवा. शरीराची अंतर्गत ताकद वाढवण्यासाठी आहारात लिंबू, संत्री यांसारखी व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा.




