TET Paper Leak : TET पेपरफुटीने उडाली खळबळ, उद्या होणारी परीक्षा अखेर रद्द; भिवंडीतून तिघांना अटक!

spot_img

पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांना पुन्हा फी भरण्याची गरज नाही; परीक्षा परिषदेचा मोठा खुलासा, पोलिसांकडून सखोल तपास सुरू

राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरू होण्यापूर्वीच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. उद्या घातल्या जाणाऱ्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर, राज्य सरकारने अत्यंत तातडीने ही परीक्षा रद्द (पुढे ढकलण्याचा) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पेपरफुटीच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, यंत्रणांनी तात्काळ चक्र फिरवून कारवाईला सुरुवात केली आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करत ठाणे पोलिसांनी भिवंडीतून पहिली मोठी कारवाई केली आहे, ज्यामध्ये पेपर लीक करणाऱ्या टोळीतील तिघा जणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. टीईटी परीक्षेचा गोपनीय पेपर बेकायदेशीरपणे लीक करणाऱ्या या संशयित तिघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. उद्या २८ जून रोजी महाराष्ट्रातील सुमारे ३७ जिल्ह्यांमध्ये, १७२८ परीक्षा केंद्रांवर तब्बल ६ लाख १२५ उमेदवार ही परीक्षा देणार होते. मात्र, परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणत्याही गैरप्रकाराशिवाय परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठीच हा तातडीचा पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या गंभीर प्रकरणावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी अधिकृत भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, “शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडणे हेच परीक्षा परिषदेचे मुख्य ध्येय आहे. या गैरप्रकाराची पाळेमुळे शोधण्यासाठी सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणूनच उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.” पुढे बोलताना त्यांनी लाखो उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये प्रामाणिक विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसल्याने, भविष्यात जेव्हा ही पुनर्परीक्षा घेतली जाईल, तेव्हा उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही किंवा त्यांना पुन्हा नव्याने नोंदणी (Registration) करण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देत लवकरच परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ