आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर अहिल्यानगर पथकाचे १५ दिवसांत दुसऱ्यांदा धडक धाडसत्र; भेसळखोरांंचे धाबे दणाणले
देश-विदेशातून शिर्डीत येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या श्रद्धेशी आणि आरोग्याशी प्रसादाच्या नावाखाली खेळ करणाऱ्या व्यावसायिक माफियांना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत जोरदार इंगा दाखवला आहे. साई मंदिर परिसरातील खासगी पेढा विक्री केंद्रे आणि पेढ्यांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर एफडीएच्या पथकाने अचानक धाडी टाकत तब्बल ६५० किलोहून अधिक वजनाचा अत्यंत निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त केला आहे. जप्त केलेला हा सर्व साठा आरोग्यास घातक असल्याने तो कायदेशीर प्रक्रियेनुसार तात्काळ नष्ट करण्यात आला असून, बाजारात त्याची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘डॅशिंग अधिकारी’ तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात अन्नपदार्थांमधील भेसळखोरीविरुद्ध युद्ध पुकारले आहे. शिर्डीतील काही खाजगी दुकानदार प्रसादाच्या नावाखाली भाविकांना आरोग्यास हानिकारक ठरणारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे पेढे विकत असल्याच्या गुप्त तक्रारी आयुक्त कार्यालयाला मिळाल्या होत्या. भाविकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ अत्यंत गंभीरतेने घेत, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या रॅकेटवर तात्काळ आणि कडक प्रहार करण्याचे आदेश दिले होते.
“भाविकांच्या आरोग्याशी आणि धार्मिक भावनांशी प्रसादाच्या नावाखाली होणारी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या दुकानांवर यापुढे थेट टाळे ठोकले जाईल.” – अन्न व औषध प्रशासन (अहिल्यानगर विभाग)
आयुक्त मुंढेंच्या कडक निर्देशानंतर अहिल्यानगर (अहमदनगर) येथील एफडीएच्या विशेष पथकाने शिर्डी शहरात मोठी नाकेबंदी करत हे धडक धाडसत्र राबवले. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १५ दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. काल दिवसभर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंदिराभोवतालच्या अनेक संशयास्पद कारखान्यांची झाडाझडती घेतली. एफडीएच्या या लागोपाठच्या आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे शिर्डी परिसरातील भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या आणि हप्तेखोरीवर चालणाऱ्या दुकानांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात साई मंदिर परिसरातील अन्न सुरक्षेचा दर्जा राखण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक केली जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.




