Love And War : भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात; विजेचा झटका लागल्याने तंत्रज्ञाचा मृत्यू

spot_img

आलिया भट्टच्या उपस्थितीत घडली दुर्दैवी घटना; भन्साळी प्रॉडक्शनकडून ४० लाखांची मदत घोषित, तर ‘FWICE’ कडून ५० लाखांची मागणी.

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ (Love and War) हा बॉलिवूडमधील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित चित्रपट मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल हे मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, आता या चित्रपटाच्या सेटवरून एक अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे. सेटवर काम करत असताना अचानक विजेचा तीव्र झटका लागल्यामुळे (Electrocution) चंद्रधारी यादव नावाच्या एका प्रतिभावान कारपेन्टर/तंत्रज्ञाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना साधारण तीन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील फिल्मसिटीमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य सेटवर ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. अपघात झाला त्या वेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील सेटवर उपस्थित होती आणि ती तिच्या वाट्याचे शूटिंग करत होती. अचानक झालेल्या या अपघातामुळे सेटवरील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या अत्यंत दु:खद घटनेची दखल घेत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन कंपनीने मृत चंद्रधारी यादव यांच्या कुटुंबीयांना तातडीने ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. चंद्रधारी यादव यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.

या संपूर्ण प्रकरणाला ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ (FWICE) या संघटनेने दुजोरा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मृत तंत्रज्ञाची मुले अजून खूप लहान आहेत, त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी ही मदत पुरेशी नाही. आम्ही भन्साळी प्रॉडक्शनला ही नुकसान भरपाईची रक्कम ४० लाख रुपयांवरून ५० लाख रुपये करण्याची विनंती केली आहे, तसेच त्याच्या पत्नीला नोकरी देण्याचीही मागणी केली आहे.” या घटनेमुळे फिल्म सेटवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि कामाच्या तासांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तंत्रज्ञांना सतत १५ ते १८ तास काम करावे लागत असल्यामुळे असे अपघात घडत असल्याचा आरोप करत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सेटवर कडक सुरक्षा उपाययोजना आणि कामाच्या तासांचे नियमन करण्याची मागणी FWICE ने केली आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट विविध कारणांमुळे आधीच लांबणीवर पडला आहे. सुरुवातीला हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता, त्यानंतर रणबीर कपूरच्या इतर प्रोजेक्ट्समुळे ही तारीख पुढे ढकलून २० मार्च २०२६ करण्यात आली होती. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली असून, ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट आता थेट २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ