ब्रँडच्या शूजची किंमत आणि कसोटी धावांमधील कनेक्शनवर किंग कोहलीचे सडेतोड उत्तर; मेलबर्नमधील ‘त्या’ ऐतिहासिक खेळीचीही केली आठवण.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या फक्त एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये खेळत असून त्याचे संपूर्ण लक्ष आता २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. नुकतीच दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळू शकला नव्हता, परंतु आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे, जिथे फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यावर तो मैदानात उतरेल. दरम्यान, विराट कोहलीने त्याच्या ‘वन८ ग्लोबल’ (one8) ब्रँडच्या एका प्रीमियर कार्यक्रमात कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने ९,२३० धावा केल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्याच्या नवीन शूजची किंमतही त्याने याच आकड्याच्या बरोबरीने म्हणजेच ९,२३० रुपये ठेवली आहे.
कार्यक्रमादरम्यान होस्ट डॅनिश सैतने विराटला एक मजेशीर प्रश्न विचारला की, “तुझ्या शूजची किंमत तुझ्या कसोटी धावांच्या बरोबरीने आहे, तर शूजची किंमत अजून वाढवण्यासाठी तू पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परशील का?” यावर विराटने हसत आणि अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिले, “नाही, माझं आर्थिक नुकसान झालं तरी चालेल, पण मी कसोटी क्रिकेटमध्ये परतणार नाही. मी त्या फॉरमॅटमधून आता पूर्णपणे निवृत्त झालो आहे.” कोहलीच्या या मिश्कील आणि प्रामाणिक उत्तराने उपस्थित चाहत्यांमध्ये एकच हशा पिकला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच्या कमबॅकच्या चर्चा रंगत होत्या, मात्र विराटने आपण टेस्ट क्रिकेट संदर्भात ‘डन’ (Done) असल्याचे स्पष्ट केले.
या संभाषणादरम्यान विराटने आपल्या कधीही हार न मानण्याच्या (Never Give Up) मानसिकतेवरही भाष्य केले. आपल्या या वृत्तीचे उदाहरण देताना त्याने २०२२ च्या टी२० विश्वचषकात मेलबर्न येथे पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या ऐतिहासिक खेळीची आठवण करून दिली. कोहली म्हणाला, “मला अशा कठीण परिस्थितींचा सामना करायला आवडतो, जिथे सर्वांना वाटते की सामना आता हातातून निसटला आहे, आणि तिथून तुम्ही सामना पुन्हा आपल्या बाजूने वळवता. लहानपणापासूनच माझा दृष्टिकोन असाच राहिला आहे. सामना प्रत्यक्षात संपेपर्यंत आपण तो हरलो आहोत, यावर माझा कधीच विश्वास नसतो.”
तो पुढे म्हणाला की, “मेलबर्नच्या सामन्यानंतर मला समजले की एका क्षणी आमची जिंकण्याची शक्यता केवळ ३ टक्के उरली होती. पण मी त्याकडे कधीच तशा दृष्टीने पाहिले नाही. माझ्यासाठी १ टक्के शक्यताही पुरेशी असते. जोपर्यंत मैदानावरील खेळ संपत नाही, तोपर्यंत आशा जिवंत असते आणि याच विश्वासामुळे मी अनेक अविस्मरणीय क्षण जगू शकलो.”




