ओतूर,प्रतिनिधी:दि२१ जून [ रमेश तांबे ]
आयशर ट्रक आणि दुचाकी धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दि.२१ रोजी अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील हॉटेल निमंत्रण जवळ घडली.
अजय बबन दुधवडे वय २१ वर्षे,अनुजा अजय दुधवडे वय ३ वर्ष, दोघेही राहणार मु.पो.माळवदवाडी,घारगाव, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर असे अपघातात मृत्यू पावलेल्या बाप लेकीचे नावे आहे. तर या अपघातात सलोनी अजय दुधवडे वय १९ वर्षे, तनुजा अजय दुधवडे वय पाच महिने रा.मु.पो. माळवदवाडी. घारगाव, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर या दोघी गंभीर जखमी झाल्या असून,त्यांच्यावर आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत समजलेली माहिती अशी की,रविवार दि.२१ रोजी दुपारी सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजय दुधवडे हे आपल्या कुटुंबासमवेत दुचाकी क्रमांक एम एच १७ डीडी ३२१५ वरून बनकरफाटा बाजूकडून ओतूरकडे येत असताना ओतूर बाजूकडून कल्याणच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक एम एच ०४ एम आर ८८६७ यांची
हॉटेल निमंत्रण समोर, समोरासमोर धडक झाली.या अपघातात अजय दुधवडे व त्यांची तीन वर्षाची मुलगी अनुजा दुधवडे यांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात अजय दुधवडे यांची पत्नी सलोनी दुधवडे व त्यांची पाच महिन्याची मुलगी तनुजा दुधवडे ह्या गंभीर जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे,पोलीस कर्मचारी नामदेव बांबळे, किशोर बर्डे,श्यामसुंदर जायभाये यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील जखमी सलोनी दुधवडे, तनुजा दुधवडे यांना पुढील उपचारांसाठी आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून ओतूर पोलिसांनी आयशर ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.




