Chandrapur Congress : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला; १६ नगरसेवक गटनेता बदलण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या दारी

spot_img

खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार गटांतील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली; बहुमताच्या जोरावर नवीन गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग

विदर्भातील चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता गमावलेल्या काँग्रेस पक्षातील वाद आता थेट विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुतीला मोठे यश मिळाले असताना, चंद्रपूर महापालिकेत ६६ पैकी २७ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत (६ जागा) एकत्र येऊन काँग्रेसला येथे सहज आपला महापौर बसवता आला असता. मात्र, निकाल लागल्याच्या पहिल्याच दिवसापासून खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाने जोर धरला. नगरसेवकांची या दोन गटांत विभागणी झाल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आणि भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या सोनाली महाडूळे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत बाजी मारली. सत्ता हातातून गेल्यानंतरही या दोन्ही नेत्यांमधील वाद शमलेला नाही.

सध्या चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा हा अंतर्गत कलह पूर्णपणे विकोपाला गेला असून, धानोरकर गटाचे तब्बल १६ नगरसेवक विद्यमान गटनेते राजेश अडूर (वडेट्टीवार गट) यांच्याविरोधात एकवटले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरकर समर्थकांनी बहुमताच्या जोरावर स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आणि नवा गटनेता निवडण्याचा ठराव मंजूर केला आहे. या गटनेता बदलाच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी मंगळवारी हा गट विभागीय आयुक्तांची भेट घेणार असल्याचे समजते. काँग्रेसच्या एकूण २७ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवकांनी बंडाचे हत्यार उपसल्यामुळे वडेट्टीवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी महापालिकेत सत्ता स्थापनेच्या वेळीही गटनेतेपदावरून दोन्ही गटांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला होता, ज्यावर प्रदेशाध्यक्षांनी मध्यस्थी करून तात्पुरता पडदा टाकला होता. मात्र, आता हा वाद पुन्हा उफाळून आल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असूनही केवळ नेत्यांच्या अहमहमिकेमुळे सत्ता गमावणाऱ्या काँग्रेस पक्षाची ही अंतर्गत गटबाजी आगामी काळात पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि संघटन मजबुतीसाठी अत्यंत हानिकारक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ