Privacy Breech : संशय अन् लाईक्सच्या हावेपोटी नवऱ्यानेच केले पत्नीचे खाजगी व्हिडिओ व्हायरल

spot_img

“रागाच्या भरात मर्यादा सोडल्या”; सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी पत्नीची अब्रू वेशीवर टांगली, सायबर पोलिसांची मोठी कारवाई

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची आणि प्रसिद्धी मिळवण्याची चटक माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते, याचे एक अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणे उदाहरण समोर आले आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात एका विकृत पतीने केवळ संशय, राग आणि सोशल मीडियावर चर्चा मिळवण्याच्या विचित्र हावेपोटी स्वतःच्याच पत्नीचे अत्यंत खाजगी फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने तक्रार केल्यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत आरोपी पतीला अटक केली असून त्याचा मोबाईलही जप्त केला आहे.

या दाम्पत्याचा विवाह २०२३ मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच नवऱ्याला पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय येऊ लागला. पत्नी माहेरी गेली, तिने फोन उचलण्यास उशीर केला किंवा एखाद्या नातेवाइकाशी जास्त वेळ संवाद साधला, तरी या व्यक्तीच्या मनात संशयाचे भूत उभे राहायचे. या संशयाला कोणताही आधार नसतानाही त्यांच्यातील घरगुती वाद इतके टोकाला पोहोचले की, पत्नी शेवटी कंटाळून माहेरी जाऊन राहू लागली. या दुराव्यामुळे चवताळलेल्या पतीने पत्नीला समाजात कायमचे बदनाम करण्यासाठी एक भयंकर आणि विकृत मार्ग निवडला.

आरोपी पती बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सक्रिय होता आणि त्याला तिथे प्रसिद्ध होण्याची प्रचंड हाव होती. याच मानसिकतेतून त्याने मर्यादा ओलांडत पत्नीच्या गोपनीयतेवर घाला घातला आणि तिचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सुरुवात केली. आपल्याच हक्काच्या माणसाने आपली अब्रू वेशीवर टांगल्याचे समजताच पत्नीला प्रचंड मानसिक धक्का बसला. हा केवळ कौटुंबिक वाद उरला नसून तिच्या सामाजिक मान-सन्मानाचा आणि गोपनीयतेचा प्रश्न बनल्याने तिने थेट कायद्याची मदत घेण्याचे ठरवले.

पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी ९ जानेवारी २०२६ रोजी कटिहारच्या सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी डिजिटल पुराव्यांचा तांत्रिक तपास सुरू केला. काही दिवस आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, परंतु पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर त्याला बेड्या ठोकल्या. अटक झाल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, राग आणि संशयाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.

कटिहारचे सायबर डीएसपी आशीफ आलम यांनी या घटनेबाबत स्पष्ट केले की, “कायदा आणि नियमांनुसार कोणाचेही खाजगी फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय सोशल मीडियावर शेअर करणे हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. आरोपी नवरा असो किंवा इतर कोणीही, दुसऱ्याच्या गोपनीयतेचा भंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही.” पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून, त्यातील खाजगी डेटाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे, जेणेकरून न्यायालयात आरोपीला कडक शिक्षा सुनावता येईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ