इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सन ग्रुपच्या संघात मोठा फेरबदल; जॅक क्राउलीवर कर्णधारपदाची जबाबदारी, तर हॅरी ब्रूक आता फक्त फलंदाजी करणार
क्रिकेट जगतात आपल्या फ्रेंचायझींचा विस्तार करणाऱ्या काव्या मारन यांच्या ‘सनरायझर्स लीड्स’ संघाने आगामी ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेसाठी आपल्या नव्या कर्णधाराची अधिकृत घोषणा केली आहे. इंग्लंडचा २८ वर्षीय स्टार फलंदाज जॅक क्राउली आता या संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी संघाची धुरा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकच्या खांद्यावर होती. मात्र, आता ब्रूकला कर्णधारपदाच्या दडपणातून मुक्त करण्यात आले असून, तो संघात केवळ एक मुख्य फलंदाज म्हणून आपली भूमिका बजावणार आहे. या निर्णयामुळे हॅरी ब्रूकला मैदानावर अधिक मोकळेपणाने आणि आक्रमकपणे फलंदाजी करता येईल, असा विश्वास व्यवस्थापनाला आहे. आता जॅक क्राउलीच्या कल्पक नेतृत्वाखाली हा संघ विजेतेपदाला गवसणी घालणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नवा कर्णधार जॅक क्राउलीचा ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील वैयक्तिक आलेख अत्यंत प्रभावी राहिला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २३ सामन्यांमध्ये ३० च्या सरासरीने ५४० धावा कुटल्या असून, त्यात तीन उत्कृष्ट अर्धशतकांचा समावेश आहे. विशेषतः मागच्या हंगामात त्याने कमालीचे सातत्य दाखवत ९ सामन्यांत ४० च्या सरासरीने २८० धावा फटकावल्या होत्या. त्याच्या याच भन्नाट फॉर्म आणि अनुभवाचा फायदा संघाला मिळवून देण्यासाठी त्याच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय मीडिया क्षेत्रातील अग्रगण्य ‘सन ग्रुप’ने (Sun Group) गेल्या वर्षी इंग्लंडच्या ‘नॉर्दन सुपरचार्जर्स’ फ्रेंचायझीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. यॉर्कशायरने ईसीबीच्या ४९% हिश्श्याव्यतिरिक्त आपला ५१% हिस्सा विकण्याचा निर्णय घेतल्यावर, सन ग्रुपने तब्बल ११५५ कोटी रुपयांची बोली लावून या फ्रेंचायझीवर १००% मालकी हक्क मिळवला. ही फ्रेंचायझी लीड्स येथील असल्याने आणि काव्या मारन यांच्या ‘सनरायझर्स’ या ट्रेडमार्क ब्रँडला पुढे नेण्यासाठी, या संघाचे नाव बदलून ‘सनरायझर्स लीड्स’ असे करण्यात आले आहे. आयपीएलमध्ये ‘सनरायझर्स हैदराबाद’ आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये (SA20) ‘सनरायझर्स ईस्टर्न केप’नंतर आता इंग्लंडमध्येही सनरायझर्सचा डंका पाहायला मिळत आहे. दरम्यान, आगामी काळात आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधारही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण पॅट कमिन्स पुढील हंगामात उपलब्ध असेल की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
असा आहे ‘सनरायझर्स लीड्स’चा संपूर्ण संघ:
जॅक क्राउली (कर्णधार), टॉम अल्सॉप, हॅरी ब्रूक, डॅन लॉरेन्स, रायन रिकेल्टन, एड बर्नार्ड, ब्रायडन कार्स, बेनी हॉवेल, टॉम लॉस, मिचेल मार्श, लियाम पॅटरसन-व्हाइट, अबरार अहमद, नॅथन एलिस, मॅथ्यू पॉट्स, आणि रीस टोपले.




