लाळ गळणे केवळ साधी सवय नसून शरीरातील मोठ्या विकारांचे लक्षण; ‘स्लीप ॲप्निया’सारख्या आजारांबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांचा मोठा इशारा
सकाळी उठल्यावर अनेकदा उशीवर लाळेचे सुकलेले डाग दिसणे ही अनेकांसाठी अतिशय सामान्य बाब असते. अनेक जण याकडे एक किरकोळ सवय म्हणून दुर्लक्ष करतात, तर काही वेळा यावरून मित्र-परिवारात थट्टा-मस्करीही केली जाते. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर ही घटना तुमच्यासोबत रोज घडत असेल तर वेळीच सतर्क होण्याची गरज आहे. कारण, झोपेत सतत लाळ गळणे हे केवळ गाढ झोपेचे लक्षण नसून, शरीरात छुप्या रीतीने बळावत असलेल्या एखाद्या गंभीर आजाराचा तो पूर्वसंकेत असू शकतो. या समस्येकडे दुर्लक्ष करणे भविष्यात आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
वैद्यकीय संशोधनानुसार, मानवी शरीरातील लाळ ग्रंथींमधून दररोज साधारण ०.५ ते १.५ लिटर लाळेची निर्मिती होत असते. तोंड ओलसर ठेवणे, दातांचे आरोग्य राखणे, हानिकारक जीवाणूंचा (Bacteria) नाश करणे आणि अन्न पचनाची प्रक्रिया सुलभ करणे ही लाळेची मुख्य कार्ये आहेत. जागृत अवस्थेत आपण ही लाळ नकळत गिळत असतो, परंतु गाढ झोपेत शरीराचे स्नायू पूर्णपणे शिथिल झाल्यामुळे ही नैसर्गिक प्रक्रिया मंदावते. प्रामुख्याने पाठीवर न झोपता कुशीवर किंवा पोटावर पालथे झोपल्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे लाळ उशीवर वाहू लागते. याशिवाय सर्दी, ॲलर्जी किंवा सायनसमुळे नाक बंद झाल्यास लोक झोपेत तोंडातून श्वास घेतात, ज्यामुळे लाळ बाहेर पडते. तसेच, तीव्र ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास असलेल्या व्यक्तींच्या शरीरात लाळेचे प्रमाण वाढून हा त्रास उद्भवतो.
कधीतरी लाळ गळणे सामान्य असले, तरी हा त्रास रोजचा असल्यास तो ‘स्लीप ॲप्निया’ (Sleep Apnea) सारख्या गंभीर विकाराचा संकेत असू शकतो. या आजारात झोपताना काही सेकंदांसाठी व्यक्तीचा श्वास रोखला जातो आणि त्यानंतर अचानक तोंडातून मोठा श्वास घेताना लाळ गळते. याव्यतिरिक्त घशातील टॉन्सिल्स वाढणे, घसा सुजणे किंवा थेट मेंदूकडून लाळ नियंत्रणाचे संदेश मिळण्यात अडथळा निर्माण झाल्यास मज्जासंस्थेच्या (Nerve) आजारामुळे लाळेवरील ताबा सुटू शकतो. त्यामुळे ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य निदान करणे अत्यंत गरजेचे आहे.




