Sanjay Raut : निवडणूक की बाजार? विधान परिषदेच्या माघारीवरून राऊतांचा भाजपवर घणाघात!

spot_img

‘एकाच दिवसात १५० कोटी उडवले’; कोकणातील माघारीसाठी ‘बीकेसी’त १५ कोटी दिल्याची संजय राऊतांची खळबळजनक टीका

विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या मुदतीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बंडखोरांची मनधरणी करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले असले, तरी यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुती आणि भाजपवर पैशांच्या गैरवापराचे गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी आणि जागा बिनविरोध करण्यासाठी अवघ्या एका दिवसात तब्बल १५० कोटी रुपयांचा घोडेबाजार झाल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण यांसह एकूण सहा ठिकाणी झालेल्या माघारींमागे मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. कोकणातील उमेदवाराच्या माघारीसाठी २५ कोटी रुपये ठरले असून, त्यापैकी १५ कोटी रुपये मुंबईतील बीकेसी येथील एका हॉटेलमध्ये थेट पोहोचवण्यात आले, असा थेट आरोप त्यांनी केला.

“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात काटकसर करण्याचे आवाहन करतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजप निवडणुकीत कोट्यवधी रुपये उडवत आहे. तुमच्याकडे पुरेसे संख्याबळ असतानाही हा पैशांचा खेळ कशासाठी?”

संजय राऊत, खासदार (शिवसेना – उबाठा)

राऊत पुढे म्हणाले की, भाजपच्या या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि लोकशाहीची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली आहे. संख्याबळ आणि यंत्रणा हाताशी असतानाही विरोधकांना पैशांच्या बळावर बाजूला सारण्याचा हा प्रकार राज्याला काळीमा फासणारा आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ