TMC Split : २८ वर्षांत पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; ५९ आमदारांसह ऋतब्रत बॅनर्जींनी थोपटले दंडदंड

spot_img

महाराष्ट्रातील ‘शिंदे पॅटर्न’ची पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती; ममता बॅनर्जींचे वर्चस्व धोक्यात, विधानसभा अध्यक्षांनी दिली नव्या गटाला मान्यता

पश्चिम बंगालच्या राजकारणात बुधवारी एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) २८ वर्षांच्या इतिहासात कधीही न झालेली मोठी फूट अखेर पडली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला पक्षातच मोठे आव्हान मिळाले आहे. पक्षात बंडखोरी करत आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांनी ५९ आमदारांच्या पाठिंब्यावर आपला एक स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्षांनीही या गटाला अधिकृतपणे स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या हातून आधी सत्ता आणि आता पक्षही निसटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. “आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत,” असा थेट दावा करत ऋतब्रत यांनी दीदींच्या साम्राज्याला सुरुंग लावला आहे.

या संपूर्ण बंडखोरीची तुलना आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी केली जात आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणि २०२३ मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत आमदारांच्या संख्याबळावर पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता, तसाच काहीसा प्रकार आता बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळेच ऋतब्रत बॅनर्जी यांची तुलना बंगालचे ‘एकनाथ शिंदे’ म्हणून केली जात असून, येत्या काळात हा नवा गटच मुख्य पक्ष म्हणून समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ऋतब्रत बॅनर्जी यांचा राजकीय प्रवास अत्यंत नाट्यमय आणि चढ-उतारांचा राहिला आहे. कोलकत्ता विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डाव्यांच्या ‘एसएफआय’ (SFI) या विद्यार्थी संघटनेतून राजकारणाचा श्रीगणेशा केला होता. तिथून पुढे २०१४ मध्ये माकपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र, आलिशान जीवनशैली आणि पक्षाविरोधी भूमिकांमुळे २०१७ मध्ये त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. नुकत्याच २०२६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया पूर्व मतदारसंघातून तृणमूलच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. मात्र, आमदार होताच त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घेतलेली भेट त्यांच्या बंडखोरीची नांदी ठरली. या भेटीनंतर ममतांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली खरी, पण आता ऋतब्रत थेट ५९ आमदारांना सोबत घेऊन मूळ पक्षच ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांच्या समर्थक गटाने या बंडखोरांच्या कायदेशीर वैधतेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेले पत्र पक्षाच्या अधिकृत लेटरहेडवर नसल्याचा दावा तृणमूलने केला आहे. तसेच पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार केवळ पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनाच असल्याचा पवित्रा पक्षाने घेतला आहे. या कायदेशीर लढाईत आपण पूर्णपणे नियमांचे पालन केले असल्याचा प्रतिदावा ऋतब्रत यांनी केला असून, त्यांनी ममता बॅनर्जींना भावनिक साद घालत, “दीदींनी आमचे मार्गदर्शक व्हावे आणि विधिमंडळ पक्षाच्या मुख्य सल्लागाराची भूमिका स्वीकारावी,” असे आवाहनही केले आहे. या राजकीय संघर्षामुळे आता बंगालच्या सत्तेची गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ