गोविंदा-चंकी पांडेला बॉलिवूडमध्ये आणणारा ‘ब्लॉकबस्टर’ निर्माता हरपला; बेधडक निर्णयांनी गाजवला होता कार्यकाळ
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) म्हणजेच सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या (Liver Cirrhosis) गंभीर आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. नुकतेच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. त्यांचे कौटुंबिक मित्र शशी रंजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, त्यांच्या निधनाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
पहलाज निहलानी हे केवळ एक यशस्वी निर्माते नव्हते, तर चित्रपटसृष्टीतील एक वजनदार व्यक्तिमत्त्व होते. ‘असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स’चे त्यांनी तब्बल २९ वर्षे अध्यक्षपद भूषवले होते, ज्याचा त्यांनी २००९ मध्ये राजीनामा दिला. त्यांनी १९८२ मध्ये ‘हथकडी’ या चित्रपटातून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. बॉलिवूडला गोविंदा आणि चंकी पांडे यांसारखे स्टार अभिनेते देण्याचे श्रेय निहलानी यांनाच जाते. त्यांनी ‘इल्झाम’ चित्रपटातून गोविंदाला, तर ‘आग ही आग’ चित्रपटातून चंकी पांडेला हिंदी चित्रपटसृष्टीत लाँच केले होते. त्यानंतर त्यांनी ‘गुनाहों का फैसला’, ‘पाप की दुनिया’, ‘मिट्टी और सोना’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आंखे’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. यातील १९९३ मधील ‘आंखे’ हा चित्रपट ९० च्या दशकातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपट निर्मितीसोबतच २०१२ मध्ये त्यांनी ‘अवतार’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले, तर २००८ मधील ‘हल्लाबोल’ चित्रपटात एक छोटी भूमिकाही साकारली होती.
पहलाज निहलानी हे त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी तयार केलेले ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ हे प्रचारगीत प्रचंड गाजले होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०१५ ते २०१७ या त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी चित्रपटांमधील बोल्ड दृश्ये, अश्लीलता आणि संवादांवर अत्यंत कठोर निर्बंध लादले होते. ‘उडता पंजाब’ आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ यांसारख्या चित्रपटांवरून झालेला वाद आणि त्यांनी घेतलेले कडक निर्णय यामुळे ते सेन्सॉर बोर्डाच्या इतिहासातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेले अध्यक्ष बनले. २०१७ मध्ये त्यांना या पदावरून हटवण्यात आले होते. निहलानी यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील एका आक्रमक आणि व्यावसायिक सिनेमाच्या सुवर्णकाळाचा अंत झाला आहे.




