मदतीचा बहाणा करून नराधमाने आजींना गाठले; दुसऱ्या घटनेत तोतया पोलिसांनी वृद्धाचे दागिने लांबवले
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आणि संतापजनक दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. पैठण तालुक्यातील पाचोड येथे एका ८० वर्षांच्या वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तर दुसरीकडे शहरात सेवानिवृत्त वृद्ध दांपत्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही अत्यंत विकृत घटना घडली. परिसरात सुसाट वारा सुटल्याने आरोपी रोहन साहेबराव आहीरे याने वृद्ध आजींना मदतीचे नाटक करत घरात नेले. तिथे त्याने आजींवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला.
पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक आणि महिलांनी तात्काळ घराकडे धाव घेतली आणि आजींची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. नातेवाईकांनी आजींना पाचोड पोलीस ठाण्यात आणून आपबिती सांगितली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी रोहन आहीरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत असून या विकृत कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दुसऱ्या घटनेत, छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात एका ७४ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची आणि त्यांच्या पत्नीची फसवणूक करण्यात आली आहे. हे दांपत्य रस्त्याने जात असताना बुलेटवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना अडवले. “आम्ही पोलीस आहोत, पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे,” असे सांगून त्यांनी दांपत्याचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी तपासणीच्या नावाखाली वृद्धाच्या हातातील सुमारे ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढायला लावल्या. त्यानंतर त्या अंगठ्या स्वतःकडे ठेवून, त्याबदल्यात दगडाचे खडे असलेली एक पुडी दांपत्याच्या हातात देऊन आरोपींनी बुलेटवरून पळ काढला.
पुडी उघडून पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दांपत्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, भररस्त्यात कोणीही पोलीस असल्याची बतावणी करून दागिने काढण्यास सांगितल्यास फसू नये आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.




