पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगर परिसरात एका अज्ञात तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास बेसबॉल स्टिकच्या साहाय्याने उभी असलेली कार फोडून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.
मिळालेल्या माहितीनुसार, डी.वाय. पाटील महाविद्यालयासमोर उभी असलेल्या कारवर या तरुणाने अचानक हल्ला चढवला. दुचाकीवर आलेल्या आरोपीने बेसबॉल स्टिकने वाहनाच्या काचा आणि इतर भागांची तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेदरम्यान काही स्थानिक नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही स्टिकचा धाक दाखवत धमकावल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये आरोपी शांतपणे येताना आणि वाहनाची तोडफोड करताना स्पष्ट दिसत आहे.
या प्रकरणी संबंधित वाहन मालकाने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. शहरातील अशा वाढत्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




