राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच बीड जिल्ह्यातील एका विवाहितेच्या छळाची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, पतीसह सासू, सासरा, दीर आणि जाऊ यांनी मिळून तिच्यावर चार लाख रुपये आणण्यासाठी वारंवार दबाव टाकला. कुटुंबाला गॅरेजसाठी जागा खरेदी करायची असल्याने माहेरहून पैसे घेऊन ये, अशी मागणी तिच्याकडे केली जात होती.
महिलेने मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ वाढल्याचा आरोप आहे. तिला उपाशी ठेवण्यात आले, तसेच आसूड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि लहान मुलांसह घराबाहेर काढल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करत आहेत.




