Mumbai Central Railway Vadapav Price Hike Cancelled : मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा! मध्य रेल्वेचा वडापाव, समोशाचे दर वाढवण्याचा निर्णय मागे

spot_img

१३ रुपयांचा वडापाव २० रुपये करण्याचा प्रस्ताव तूर्तास रद्द; पुढील आदेश येईपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती

मुंबईकरांचे सर्वात आवडीचे खाद्य आणि लोकल प्रवाशांचा हक्काचा आधार असलेला ‘वडापाव’ महागणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. १ जून २०२६ पासून आपल्या अखत्यारीतील रेल्वे स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याचा मध्य रेल्वेचा (Central Railway) निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन दरवाढ लागू न होता पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवाशांना जुन्याच दरांमध्ये रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थ मिळणार आहेत. मध्य रेल्वेच्या या ‘यू-टर्न’मुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला लागणारी कात्री टळली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य पूर्वेतील संकटामुळे इंधन आणि गॅसच्या किमती वाढल्याचे कारण देत मध्य रेल्वेने खाद्यपदार्थांचे दर सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या नवीन प्रस्तावानुसार, प्रवाशांचा लाडका १३ रुपयांचा वडापाव थेट २० रुपयांना मिळणार होता. याशिवाय व्हेज समोसा, व्हेज पफ आणि साबुदाणा वडा यांचे भावही २० रुपये निश्चित करण्यात आले होते. तसेच मेन्यू कार्डमध्ये काही नवीन पदार्थांचा समावेश करून पावभाजी आणि व्हेज पिझ्झा ५० रुपयांना, तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला डोसा ३५ रुपये आणि इडली-सांबार ३० रुपये अशा नवीन किमती १ जूनपासून लागू होणार होत्या.

मात्र, या दरवाढीवरून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरण्याची शक्यता लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने बॅकफूटवर येत हा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, पुढील आदेश येईपर्यंत प्रवाशांना जुन्याच दरांमध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. त्यामुळे पाऊस असो वा छोटी भूक, प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर पूर्वीच्याच स्वस्त दरात गरम कुरकुरीत वडापावचा आस्वाद घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ