पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. क्वेटा शहराजवळील चमन गेट परिसरात जाफर एक्स्प्रेसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. रेल्वे रुळांजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस क्वेटा कॅन्टच्या दिशेने जात असताना हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. काही ठिकाणी आगही लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, बचाव पथके आणि सुरक्षा दल तातडीने दाखल झाले आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. स्फोटामुळे आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्याचेही समोर आले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून तपास सुरू करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून चौकशी केली जात आहे. बलुचिस्तान सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जाफर एक्स्प्रेस ही पाकिस्तानमधील महत्त्वाची लांब पल्ल्याची रेल्वे सेवा मानली जाते. ती बलुचिस्तानला देशातील इतर प्रमुख शहरांशी जोडते. मात्र, हा मार्ग संवेदनशील भागातून जात असल्याने पूर्वीही या रेल्वेला लक्ष्य करण्यात आले आहे. बलुच लिबरेशन आर्मीचे या भागात मोठे अस्तित्व असल्याने रेल्वे आणि सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ले होत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीदेखील या रेल्वेच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.




