भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक मानाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असलेले माजी नेमबाज राजा रणधीर सिंग यांचे आज निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांची प्रकृती खालावत होती. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते घरी परतले होते, मात्र अखेर त्यांनी आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजा रणधीर सिंग यांनी नेमबाजी क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळवून दिली होती. 1978 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी ‘ट्रॅप’ प्रकारात सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. नेमबाजीमध्ये भारतासाठी आशियाई स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक ठरले होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी पाच वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर त्यांनी क्रीडा प्रशासनातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2024 मध्ये त्यांची ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी काही काळापूर्वी या पदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्या निधनाबद्दल क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांनीही सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत राजा रणधीर सिंग यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे म्हटले. खेळाडू, प्रशासक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी दिलेला वारसा भारतीय क्रीडा इतिहासात कायम स्मरणात राहणार आहे.




