विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट; तर ‘इंटिग्रेटेड’ कॉलेज बंद करण्याची क्लास असोसिएशनची मागणी
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ (NEET) मधील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, पालकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील आरोपींचे नाव आघाडीवर आल्याने राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत दोन मोठी आंदोलने झाली, ज्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयाबाहेर अचानक धडक मोर्चा काढला. कोणतीही पूर्वकल्पना नसताना झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली. महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट रस्त्यावर बसून ठिय्या सुरू केला. अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांची धरपकड करत त्यांना पोलीस व्हॅनमधून ताब्यात घेतले.
दुसरीकडे, पेपरफुटी प्रकरणाच्या आडून संपूर्ण कोचिंग क्लास व्यवसायाची होत असलेल्या बदनामीच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’ने आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मोटेगावकर क्लासेससारख्या एक-दोन संस्थांमुळे प्रामाणिकपणे चालणाऱ्या इतर सर्व क्लासेसना बदनाम केले जात असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
आझाद मैदानावर जमलेल्या विविध कोचिंग क्लासेसच्या प्रतिनिधींनी पेपरफुटीच्या वाढत्या प्रकरणांमागे ‘इंटिग्रेटेड क्लासेस’ (शाळा-कॉलेज आणि क्लासेसचे छुपे युतीकरण) कारणीभूत असल्याचा दावा केला आहे:
कॉर्पोरेट क्लासेस आणि शाळा-कॉलेजांशी संलग्न असलेली ही ‘इंटिग्रेटेड’ पद्धत सरकारने तात्काळ बंद करावी. जे शिक्षक अधिकृत शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकवतात, त्यांना खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.अशा संस्थांवर आणि कॉर्पोरेट क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर नियमावली लागू करावी. आज सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान क्लास चालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सरकार आणि विविध राजकीय नेत्यांना देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.




