बीड जिल्ह्यात गाजलेल्या संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो बीड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्यावर तुरुंगातच प्राथमिक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला सलाईन लावण्यात आल्याचे समजते.
वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याला मूत्राशयाशी संबंधित संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘युरोसिस्टायटिस’ या आजारामुळे त्याला लघवीच्या ठिकाणी वेदना आणि त्रास जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तब्येतीत चढ-उतार होत असल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथकाला पाचारण केले.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने कारागृहात जाऊन कराडची तपासणी केली. त्यानंतर पुढील उपचार आणि अधिक तपासण्यांसाठी त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. अपहरणानंतर झालेल्या हत्येच्या तपासात वाल्मिक कराडचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
यापूर्वीही वाल्मिक कराडला वैद्यकीय कारणांमुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. आता पुन्हा त्याची प्रकृती बिघडल्याने विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागून आहे.




