Petrol And Diesel Situation : पेट्रोल-डिझेलसाठी हाणामारी, जळगावात कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला तर बुलढाण्यात १२ तास रांगा

spot_img

शेतीची कामे ठप्प झाल्याने शेतकरी आक्रमक; विरोधकांचा सरकारवर घणाघात, “डबल इंजिनमधील तेल संपले का?” जयंत पाटलांचा सवाल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर तब्बल ४ रुपयांची वाढ झाली असतानाच, आता इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पुरवठ्याअभावी पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या मैलोन्मैल लांब रांगा लागल्या असून इंधनाचा टँकर येताच नागरिकांच्या उड्या पडत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने शेतीच्या कामांसाठी डिझेल न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा संतापला असून अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नंबर लावण्याच्या आणि इंधन संपण्याच्या कारणावरून ग्राहकांमध्ये बाचाबाची आणि हाणामारीच्या घटना घडत आहेत, तर जळगाव जिल्ह्यात एका कर्मचाऱ्यावर थेट जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील एका पेट्रोल पंपावर साठा संपल्याने कर्मचाऱ्याने पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने दोन अज्ञात तरुणांनी २१ वर्षीय कर्मचारी तुषार गुरव याच्या पोटात थेट चाकू खुपसला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे पंप कर्मचारी प्रचंड धास्तावले असून पंपांवर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे, जळगावच्याच पारोळा महामार्गावर संतप्त नागरिकांनी दुचाकी आणि रिकाम्या कॅन रस्त्यावर आडव्या लावून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

बुलढाणा ते चिखली मार्गावरील पेट्रोल पंपांवर शेतकरी तब्बल १२-१२ तासांपासून रात्रीपासून ट्रॅक्टरसह रांगेत उभे आहेत. मात्र, एवढी प्रतीक्षा करूनही पंप चालक एका ट्रॅक्टरला केवळ १ हजार रुपयांचेच डिझेल देत असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे. ट्रॅक्टरसाठी एवढे डिझेल केवळ येण्या-जाण्यासाठीच खर्च होत असताना, ओळखीच्या लोकांना मात्र पूर्ण टाकी भरून दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच, वाशिम शहरातील अकोला नाका येथील पंपावर डिझेलचा टँकर येताच गर्दी अनियंत्रित झाली. तिथे केवळ नंबर लावण्यावरून वाद होऊन नागरिकांनी एकमेकांना डिझेलच्या कॅनने बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राज्यातील या गंभीर परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. जळगावमधील चाकू हल्ला, बुलढाण्यातील १२ तासांच्या रांगा आणि अकोल्यातील हाणामारीचा उल्लेख करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. नागपूरमध्ये एका बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या गाडीत टाकायला डिझेल नाही, अशी परिस्थिती असल्याचे सांगत, “राज्यात नक्की चाललंय तरी काय? या डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले आहे का?” असा खोचक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ