Malegaon News : मालेगावमध्ये गोवंश साठवणुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; माजी महापौरांचे नाव चर्चेत

spot_img

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गोवंश जनावरांच्या कथित बेकायदेशीर साठवणुकीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईत मालेगावचे माजी महापौर आणि एमआयएमशी संबंधित स्थानिक नेते अब्दुल मलिक मोहम्मद युसुफ यांचे नाव समोर आल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पवारवाडी आणि किल्ला पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शहरातील विविध भागांमध्ये गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली. या कारवाईदरम्यान सवंदगाव परिसरातील एका फार्महाऊससह संशयित गोदाम आणि आणखी एका ठिकाणाची तपासणी करण्यात आली. पोलिसांना येथे १८ गोवंश जनावरे आढळून आली असून ती ताब्यात घेण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत सुमारे ३ लाख २० हजार रुपये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही जनावरे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आली होती. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात काही स्थानिक व्यक्तींची चौकशी सुरू असून संबंधित कागदपत्रे आणि व्यवहारांची माहितीही तपासली जात आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे मालेगावच्या राजकीय वातावरणातही खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात असताना पोलिसांनी कोणालाही वाचवले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ