जगभरात निर्माण झालेल्या अस्थिर आणि युद्धजन्य वातावरणाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संयम आणि बचतीचा संदेश दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशवासियांना इंधनाचा वापर मर्यादित ठेवण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे आणि कार पूलिंगसारख्या पर्यायांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि जागतिक तणाव लक्षात घेता पेट्रोल-डिझेलची बचत करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच मोदी यांनी पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचा सल्ला दिला. परकीय चलनाचा ताण कमी करण्यासाठी परदेश दौरे शक्यतो कमी करावेत, असेही त्यांनी नागरिकांना सांगितले. खाद्यतेलाचा वापरही मर्यादित ठेवावा, जेणेकरून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशाने आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली. जनतेला सतत बचतीचे सल्ले देण्यापूर्वी सरकार आणि सत्ताधारी नेत्यांनी स्वतःच्या वर्तनाकडेही पाहावे, असे त्या म्हणाल्या. मोदी परदेश दौऱ्यांसाठी चार्टर्ड विमानांचा वापर करतात आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांना खर्च कमी करण्याचे आवाहन करतात, ही विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला.
दमानिया यांच्या टीकेवर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना उपरोधिक शब्दांत उत्तर दिले. “अंजली दमानिया या अत्यंत उच्च दर्जाच्या विचारवंत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी तुलना करणे शक्य नाही,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.




