महानआर्यमन सिंधियांची तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गरुडझेप; अॅमेझॉनच्या सिएटल मुख्यालयातून नव्या युगाची घोषणा
भारतीय स्टार्टअप्सचा जागतिक स्तरावर बोलबाला वाढत असतानाच, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि तरुण उद्योजक महानआर्यमन सिंधिया यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांचे स्टार्टअप ‘Ethara AI’ आणि जगातील सर्वात मोठी क्लाउड सेवा पुरवणारी कंपनी ‘अमेझॉन वेब सर्विसेस’ (AWS) यांच्यात एक अत्यंत धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. अमेरिकेतील सिएटल येथील अमेझॉनच्या मुख्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महानआर्यमन सिंधिया आणि त्यांचे सह-संस्थापक सूर्यांश राणा यांनी AWS चे उपाध्यक्ष स्वामी शिवसुब्रमण्यन यांच्याशी ‘Agentic AI’ च्या भविष्यावर सविस्तर चर्चा केली. या भागीदारीचा मुख्य उद्देश केवळ एआय (AI) वापरणे हा नसून, भारतात पुढील पिढीतील अत्यंत प्रगत आणि बुद्धिमान ‘Intelligent Agents’ तयार करणे हा आहे. यासाठी लागणारी पायाभूत सुविधा, ट्रेनिंग यंत्रणा आणि मूल्यांकन प्रणाली दोन्ही कंपन्या मिळून विकसित करणार आहेत. यामुळे उद्योगांना पारंपारिक आणि स्थिर एआय वर्कफ्लोमधून बाहेर काढून पूर्णपणे स्वायत्त (Autonomous) प्रणालीकडे नेले जाणार आहे.
या भागीदारीमुळे भारत आता केवळ एआय तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता, त्याचा निर्माता म्हणून जागतिक नकाशावर ठळकपणे समोर येणार आहे. महानआर्यमन सिंधिया यांनी यावेळी एक अत्यंत प्रभावी विधान केले, ते म्हणाले, “जर एआयचे सर्वाधिक वापरकर्ते भारतीय असतील, तर त्याच्या निर्मितीचे मुख्य केंद्रही आपला भारतच असायला हवा.” या विजनमुळे आगामी काळात फ्रंटियर इंटेलिजन्स आणि स्केलेबल ट्रेनिंग एन्व्हायर्नमेंट्सच्या बाबतीत भारत जगाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. सिंधियांच्या या जागतिक कराराचे तंत्रज्ञान क्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे.




