विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने अखेर तामिळनाडूतील सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळवले असून, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता जवळपास निश्चित मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. विविध पक्षांच्या हालचालींमुळे सत्तास्थापनेवर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर काही पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
निवडणुकीत टीव्हीके पक्षाला मोठे यश मिळाले होते. पक्षाचे १०८ आमदार निवडून आले होते. मात्र विजय हे दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांचे एक मत कमी धरले गेले आणि पक्षाची प्रभावी संख्या १०७ वर आली. बहुमतासाठी ११८ जागांची गरज असल्याने विजय यांना अतिरिक्त पाठिंब्याची आवश्यकता होती.
दरम्यान, काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतरही बहुमताचा आकडा पूर्ण होत नव्हता. त्यामुळे कोणता पक्ष विजय यांच्या बाजूने उभा राहणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
याच दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CPI – M) तसेच विदुथलाई चिरुथैगल काची (VCK) यांनी टीव्हीकेला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा आवश्यक आकडा गाठला आणि सत्तास्थापनेचा मार्ग खुला झाला.
याआधी राज्यपालांनी दोन वेळा विजय यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ११८ आमदारांच्या सह्या सादर करण्यास सांगत शपथविधीला मंजुरी दिली नव्हती. दुसरीकडे द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र अखेर विजय यांनी आवश्यक समर्थन मिळवत राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवली आहेत.
तामिळनाडूच्या राजकारणात हा मोठा बदल मानला जात असून, अभिनेता ते मुख्यमंत्री असा विजय यांचा प्रवास आता वास्तवात उतरण्याच्या मार्गावर आहे.




