पराभवानंतर ‘दीदीं’च्या बैठकीला आमदारांची दांडी; टीएमसीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली, भाजपच्या ‘खेला’कडे सर्वांचे लक्ष!
“यशाचे अनेक वाटेकरी असतात, पण पराभवाचा वाटा उचलण्यास कोणीही तयार नसते,” हा मानवी स्वभाव सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रकर्षाने दिसून येत आहे. १९८१ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या आणि सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर सध्या अस्तित्वाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा करिष्मा चालला नाही आणि भाजपने २०० हून अधिक जागा जिंकून टीएमसीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. चंद्रिमा भट्टाचार्य, शशी पांजा आणि अरूप बिस्वास यांसारखे पक्षाचे दिग्गज चेहरे पराभूत झाले आहेत. पराभवाचे खापर ममता दीदींनी निवडणूक आयोग आणि भाजपवर फोडले असले तरी, खरी लढाई आता पक्षाच्या आत सुरू झाली आहे.
निकालांनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कोलकत्त्यातील आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे १० आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. जरी काहींनी हिंसाचार किंवा वैयक्तिक कारणांचे समर्थन दिले असले, तरी राजकीय वर्तुळात या गैरहजेरीचा अर्थ ‘बंडाची तयारी’ असा काढला जात आहे.
कुचबिहारचे नेते रवींद्रनाथ घोष यांनी उदय गुहा यांच्यावर थेट भाजपला मदत केल्याचा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. तिकीट कापल्यामुळे नाराज असलेले माजी आमदार मोनिरुल इस्लाम यांनी “पक्षाला अपमानाची फळं भोगावी लागत आहेत,” असे खळबळजनक विधान केले आहे.
एकीकडे ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीशी संपर्क साधून आपली राष्ट्रीय ताकद टिकवण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे भाजप बंगालमध्ये एखादा मोठा ‘राजकीय भूकंप’ घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही नाराज नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून, तृणमूल काँग्रेस एकसंध ठेवणे हे आता ममता दीदींसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात आता नेमका कोणता ‘खेला’ होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सलग १५ वर्षांच्या सत्तेनंतर ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या अंतर्गत आव्हानाचा सामना करावा लागत आहे.




