थलपती विजयच्या समर्थनार्थ दिग्गज अभिनेत्याचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’चे (टीव्हीके) प्रमुख विजय यांच्या शपथविधीला राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी तांत्रिक कारणे पुढे करत खोडा घातल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्यपालांची कृती हा तमिळनाडूच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. कमल हासन यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट लिहित सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘एस. आर. बोम्मई’ खटल्याचा संदर्भ दिला असून, बहुमत हे राजभवनाच्या बंद दाराआड नव्हे, तर विधानसभेच्या पटलावरच सिद्ध झाले पाहिजे, असे ठामपणे नमूद केले आहे. त्यांनी एम. के. स्टॅलिन यांच्या राजकीय परिपक्वतेचे कौतुक करतानाच, घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींनीही आपल्या कर्तव्याचे भान राखावे, अशी आठवण करून दिली आहे.
विजय यांच्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण न देणे हे लोकशाहीला धक्का पोहोचवणारे असून २३३ नवनिर्वाचित सदस्यांना अद्याप शपथ घेता न येणे हा राज्याचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली आहे. काँग्रेसनेही या प्रकरणात राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला असून, राजभवनच्या आडून भाजप गलिच्छ राजकारण खेळत असल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे आगामी काळात तमिळनाडूतील हा सत्तासंघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




