बीड जिल्ह्यातील उमापूर गावात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका तरुणीचा वापर करून विविध तरुणांना विवाहाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फसवणुकीत एजंटांची महत्त्वाची भूमिका होती. ते विवाहासाठी इच्छुक तरुणांना संपर्क साधून विश्वास संपादन करत आणि त्यानंतर संबंधित मुलीसोबत लग्न लावून देत. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच ती तरुणी गायब होत असे.
अशा प्रकारे यापूर्वी आठ वेळा वेगवेगळ्या तरुणांशी तिचे लग्न लावण्यात आले होते. अलीकडेच नवव्या तरुणासोबतही हीच पद्धत वापरून फसवणूक करण्यात आली. आपल्याला फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणामुळे बोगस लग्नांच्या माध्यमातून सुरू असलेल्या फसवणूक टोळ्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, लग्नसराईच्या काळात नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




