Tamil Nadu : तमिळनाडूत पीरियाकरुप्पन यांचा अवघ्या एक मताने थरारक पराभव!

spot_img

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत यंदा अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली असून एका मताने निकाल लागल्याची घटना राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. डीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री के.आर. पीरियाकरुप्पन यांना अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला. त्यांच्या विरोधात टीव्हीकेचे उमेदवार सीनिवास सेथुपती यांनी 83,375 मते मिळवत विजय मिळवला, तर पीरियाकरुप्पन यांना 83,374 मतांवर समाधान मानावे लागले.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ही लढत अत्यंत रंगतदार होती. शेवटच्या फेरीनंतरही चित्र स्पष्ट होत नव्हते. विशेष म्हणजे, अंतिम फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन सुमारे 30 मतांनी आघाडीवर होते. मात्र शेवटच्या टप्प्यात परिस्थिती अचानक बदलली आणि एका मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या मतदारसंघातील आर. पलकुरीची पंचायत क्षेत्रातील दोन हजारांहून अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. प्रशासकीय सीमा वाद न सुटल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या बहिष्काराचा थेट परिणाम निकालावर झाला असावा, अशी चर्चा सुरू आहे.

पीरियाकरुप्पन हे डीएमकेमधील अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. 2006 पासून ते सलग चार वेळा तिरुप्पत्तूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2021 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर नंतर त्यांना सहकार विभागाचे मंत्रीपद देण्यात आले. त्यांनी याआधीही विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. या अत्यंत नाट्यमय निकालामुळे तमिळनाडूतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ