महाराष्ट्र दिनी रिलीज होणाऱ्या या महासिनेमाने मोडले ‘वेड’चे रेकॉर्ड; दीड कोटींची तिकीट विक्री पूर्ण
मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सज्ज असलेला रितेश देशमुखचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘राजा शिवाजी’ उद्या, १ मे रोजी (महाराष्ट्र दिन) जगभरातील चित्रपटगृहात धडकणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली असून ३० एप्रिलच्या सकाळपर्यंत ६० हजारांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत दीड कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली असून, रितेशच्या मागील ‘वेड’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या तुलनेत हा आकडा तिप्पट मोठा आहे. आता हा चित्रपट नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चा विक्रम मोडणार का, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
रितेश देशमुखने केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शन आणि निर्मितीची धुराही सांभाळत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा प्रवास अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात पडद्यावर मांडला आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या हिंदी-मराठीतील दिग्गज कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे. भव्य सेट्स, ऐतिहासिक अचूकता आणि प्रेरणादायी संवाद यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी केवळ एक अनुभव नसून एक सोहळा ठरणार आहे. लाँग वीकेंडचा फायदा मिळाल्यास हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




