निशाण्यावर होती दिग्गज अधिकाऱ्यांची ‘हिटलिस्ट’, पण हिंदू असल्याने काश पटेल यांचे नाव वगळले? तपासात धक्कादायक खुलासे!
वॉशिंग्टनमध्ये आयोजित ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ दरम्यान झालेल्या गोळीबाराने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. ज्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे संपूर्ण कॅबिनेट आणि अतिमहत्वाचे अधिकारी उपस्थित होते, तिथेच मृत्यूचे तांडव घडवण्याचा कट रचला गेला होता. कोणाच्याही कल्पनेपलीकडे जाऊन, हल्लेखोर आधीच त्याच हॉटेलमध्ये वास्तव्यास होता जिथे हा हाय-प्रोफाइल सोहळा रंगला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यादेखत तो सहजपणे कार्यक्रमस्थळी पोहोचला. ज्यावेळी ट्रम्प यांचे भाषण सुरू होते, त्याचवेळी हा थरार घडला. हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षारक्षकांनी तातडीने ट्रम्प यांना टेबलखाली लपवून मानवी साखळी करत सुरक्षित बाहेर काढले, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोराने तयार केलेली ‘हिटलिस्ट’. तपासादरम्यान आरोपी ॲलनकडे एक यादी सापडली, ज्यामध्ये ट्रम्प यांच्यासह अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे होती. मात्र, या यादीत भारतीय वंशाचे एफबीआय संचालक काश पटेल यांचे नाव नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हल्लेखोर हा ख्रिश्चनविरोधी विचारसरणीचा होता आणि काश पटेल हे हिंदू असल्याने त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
तथापि, तपासाचा दुसरा पैलू असाही सांगतो की, हल्लेखोराचे मुख्य लक्ष केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होते आणि तपास यंत्रणांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्याने काश पटेल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले नसावे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराकडून तीन अत्याधुनिक बंदुका जप्त करण्यात आल्या असून, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेतील ही आजवरची सर्वात मोठी चूक मानली जात आहे. आता या कटामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.




