८ तासांच्या प्रतीक्षेनंतर हाती पडतोय फक्त ५ किलो गॅस
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या रिक्षाचालकांना जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शहरात सीएनजी (CNG) आणि एलपीजी (LPG) गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, परिस्थिती इतकी भयावह आहे की रिक्षेची चाके रस्त्यावर धावण्याऐवजी गॅस पंपाच्या रांगेतच थबकलेली दिसत आहेत.
सकाळच्या सात वाजेपासून रिक्षाचालक पंपावर रांगा लावतात. ही रांग साडेतीन किलोमीटरपर्यंत लांबलेली असते. विशेष म्हणजे, प्रत्येक पाच मिनिटाला रिक्षा पुढे सरकवण्यासाठी चालकाला गाडीतून खाली उतरून ती हाताने ढकलावी लागते. हा ‘मॅन्युअल’ संघर्ष तब्बल ८ ते ९ तास चालतो, तेव्हा कुठे चालकाचा नंबर येतो. इतका वेळ वाया घालवूनही प्रशासकीय निर्बंधांमुळे एका रिक्षात केवळ ५२० रुपयांचा (सुमारे ५ किलो) गॅस भरला जात आहे.
एक रिक्षाचालक दिवसाला जेमतेम कमाई करून आपले कुटुंब जगतो. मात्र, दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ रांगेतच जात असल्याने त्यांच्या उत्पन्नावर संक्रांत आली आहे. मिळणारा ५ किलो गॅस फक्त १०० ते ११० किलोमीटरच्या प्रवासासाठी पुरेसा ठरतो. शासन स्तरावर तीन महिन्यांचा साठा आरक्षित असल्याच्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र रिक्षाचालकांच्या पदरी निराशाच पडत आहे.
“आम्ही दिवसभर रांगेत उभे राहायचे की प्रवाशांची सेवा करायची? ८ तास रांगेत उभे राहून फक्त १०० किमी चालण्याइतका गॅस मिळतो, यात आमचे घर कसे चालणार?” असा उद्विग्न सवाल स्थानिक रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे. इंधनासाठी होणारा हा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय यामुळे रिक्षाचालकांना नाईलाजाने भाडेवाढ करावी लागत आहे. ज्या प्रवासासाठी पूर्वी २० ते ३० रुपये आकारले जायचे, तिथे आता ४० ते ५० रुपये मागावे लागत आहेत. यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत असून, रिक्षाचालक आणि जनता या दोघांमध्येही प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.




