मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली असून, या प्रतिष्ठेच्या पदासाठी काही प्रमुख नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर हे या शर्यतीत आघाडीवर आहेत. या दोघांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
याशिवाय महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावेही चर्चेत आहेत. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांचाही विचार होता, मात्र त्यांची दिल्लीत प्रतिनियुक्ती होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या संधी कमी झाल्या आहेत.
अश्विनी भिडे या अनुभवी आयएएस अधिकारी असून त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यशस्वी नेतृत्व केले आहे. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत असून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे.
दुसरीकडे, डॉ. मिलिंद म्हैसकर हेही अनुभवी अधिकारी असून सार्वजनिक बांधकाम विभागातील त्यांच्या कामगिरीमुळे ते मजबूत दावेदार मानले जात आहेत. जर भिडे यांना सध्याच्या जबाबदाऱ्यांमध्येच ठेवण्याचा निर्णय झाला, तर म्हैसकर यांच्या नावाला अधिक संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
दरम्यान, या नियुक्तीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून, त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा होणार असल्याचे समजते. मुंबईसारख्या महत्त्वाच्या महानगराच्या प्रशासनाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.




