डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी सुनीता कुलकर्णी कशी बनली ‘काजल किरण’? वाचा एका विस्मृत अभिनेत्रीचा थक्क करणारा प्रवास
बॉलिवूडमध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या कधी पूर्णपणे जगासमोर येत नाहीत. अशीच एक कथा आहे अभिनेत्री काजल किरण (मूळ नाव: सुनीता कुलकर्णी) यांची. १९७७ साली ‘हम किसी से कम नही’ या ब्लॉकबस्टर सिनेमातून ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण करणाऱ्या काजल यांना वाटलं होतं की त्या सुपरस्टार बनतील. पण झालं नेमकं उलट. चित्रपट सुपरहिट झाला, गाणी गाजली, पण काजल यांच्या पदरी मात्र अपयश आलं.
काजल यांनी त्यांच्या अपयशाचे खापर थेट ऋषी कपूर यांच्यावर फोडले होते. ऋषी कपूर यांच्या ‘रोमँटिक हिरो’ इमेजमुळे माझ्या भूमिकेकडे कोणाचे लक्ष गेले नाही आणि माझं करिअर उद्ध्वस्त झालं, असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. इतकंच नाही तर दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी केलेल्या करारामुळे आपल्याला इतर कामं मिळाली नाहीत, असंही त्यांचं म्हणणं होतं. यावर ऋषी कपूर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, “तिचं नशीब खराब होतं. त्याच काळात डिंपल कपाडिया आणि जया प्रदा यांनीही पदार्पण केलं होतं, पण त्या यशस्वी झाल्या.”
अनेक वर्षं बेपत्ता असलेल्या काजल यांच्याबद्दल २०१८ मध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली. त्या सध्या नेदरलँड्स (द हेग) येथे स्थायिक आहेत. त्यांनी एका डच व्यक्तीशी (काही अहवालांनुसार एका भारतीय वंशाच्या डॉक्टरशी) लग्न केलं असून त्यांना मीनाक्षी आणि सुदक्षिनी नावाच्या दोन मुली आहेत. झगमगत्या विश्वापासून दूर, काजल आता आपल्या कुटुंबासोबत तिथे सुखी आयुष्य जगत आहेत.




