नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत असून, यावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. काही नेत्यांचे खरातसोबतचे फोटो समोर आल्यामुळे या प्रकरणाला आणखी रंग चढला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीवर टीका केली. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आलं, हा आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.
अंधारे यांच्या मते, 2020 मध्ये मीरगाव ग्रामसभेत पाणीपुरवठ्याबाबत ठराव करण्यात आला होता. ग्रामसभेच्या शिफारशीवर प्रत्येक व्यक्तीला 30 लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला होता. हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी रूपाली चाकणकर यांनी शिफारस केली होती, तर मंजुरी जयंत पाटील यांच्या उपसमितीकडून देण्यात आली होती.
त्यांनी स्पष्ट केलं की, हा विषय थेट मुख्यमंत्र्यांकडे जात नाही. मात्र, पुढे जर पाईपलाईनमध्ये बदल करण्यात आला असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.




