अशोक खरात याच्याविरुद्ध उघड झालेल्या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले असून, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अनेकांना जाळ्यात अडकवल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील काही धक्कादायक बाबी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आल्याची माहिती मिळत आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) कार्यरत असून, तपासादरम्यान फसवणुकीच्या विविध पद्धती उघड होत आहेत.
तपासात असेही आढळले की, खरातने लोकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र दोन टीम तयार केल्या होत्या. नातेवाईक, ओळखी आणि रेफरन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करून तो आधीच तयारी करत असे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या व्यक्तींना काही मिनिटांतच अचूक माहिती सांगून तो त्यांचा विश्वास जिंकत असे.
यासाठी तो ‘हॉट रीडिंग’ आणि ‘कोल्ड रीडिंग’सारख्या मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करत होता. हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती मिळवून ठेवली जाते, तर कोल्ड रीडिंगमध्ये संभाषणातून अंदाज बांधून समोरच्याला प्रभावित केले जाते. यासोबतच फेस रीडिंग आणि भीती निर्माण करण्याच्या तंत्रांचा वापर करून त्याने अनेकांना फसवले असल्याचे समोर येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




