दापोली मतदारसंघाला तब्बल ५० वर्षांनंतर मंत्रीपद मिळाल्याचा आनंद व्यक्त करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. इतक्या वर्षांची उणीव काही वर्षांत भरून काढणे सोपे नसले, तरी प्रभावी योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कदम म्हणाले की, इच्छाशक्ती दाखवली असती तर कॅबिनेट मंत्रीपदही मिळू शकले असते. मात्र, त्या पदावर एकच खाते मिळण्याची शक्यता असते आणि कोणते खाते मिळेल हे निश्चित नसते. त्याऐवजी राज्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे विविध खात्यांची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमातून कोकणाच्या विकासासाठी अधिक व्यापक पातळीवर काम करता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




